सप्रेम नमस्कार /
जय गजानन श्री गजानन महाराज भक्तांसाठी विदर्भातील पंढरी म्हणजे शेगाव. सर्व भाविकांचा आवडता ग्रंथ म्हणजे “श्री गजानन विजय ग्रंथ” व ठिकाणांमध्ये आवडते ठिकाण म्हणजे ‘श्री गजानन महाराज मंदिर शेगाव‘. शेगाव ची महती एवढी आहे जरी गर्दीमध्ये एखाद्या माणसाने शेगाव या गावाचा उल्लेख केला तरी आपण त्याच्याकडे आदर पूर्वक बघतो. शेगाव ही गजानन महाराजांची कर्मभूमी. बत्तीस वर्षे श्री गजानन महाराजांनी ज्या लीला केल्या, त्यांचे लिखाणाचे कार्य दासगणू महाराजांनी करून श्री गजानन विजय ग्रंथ लाखो लाखो घरांपर्यंत पोहोचवण्याचे अफाट कार्य केले.
श्री गजानन विजय ग्रंथ म्हणजे गजानन भक्तांसाठी एक गीताच आहे. भगवद्गीते मध्ये व श्री गजानन विजय ग्रंथ यातील एक साम्य म्हणजे दोघांमध्ये भक्ती पासून मुक्ती पर्यंतचा रस्ता दाखवलेला आहे व एक फरक म्हणजे भगवद्गीता हे तत्वज्ञान रूप आहे व श्री गजानन विजय ग्रंथ हा गोष्टी स्वरूप आहे, ज्यात गजानन महाराजांच्या अनेक लीला चमत्कार यांचा उल्लेख केलेला आहे.
श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट मोताळा जि. बुलढाणा तर्फे आम्ही आपल्यासाठी लवकरच श्री गजानन विजय गुढार्थ लीलामृत पाच दिवसीय कथा सादर करणार आहोत.
“श्री गजानन विजय” ग्रंथामध्ये भक्तिमार्ग सोपा करून, भक्ती पासून मुक्ती पर्यंतचा मार्ग सांगण्यात आलेला आहे. श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेत लिहिलेला आहे, पण त्यात खूप गूढार्थ आहेत ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच श्री गजानन विजय ग्रंथा बाहेरील अनेक दिव्य लीला तसेच त्यात उल्लेख केलेले महान संत व भक्त दास गणू, गोविंद बुवा टाकळीकर, गोपाल दास महंत, माधवनाथ महाराज, बंकटलाल, पीतांबर शिंपी, भास्कर पाटील, नरसिंग महाराज, कुकाजी पाटील, हरी पाटील व त्यांचे बंधू, बाळकृष्णबुवा, दादासाहेब खापर्डे, गंगाभारती गोसावी, पुंडलिक बाबा भोकरे, बाईजाबाई, बंडू तात्या, भाऊ कवर, विष्णू सावजी, बच्चूलाल अग्रवाल, बापुना काळे, गोपाळ बुटी, आत्माराम, रामचंद्र निमोणकर, गोविंद बुवा शास्त्री, इत्यादी विषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेथे आम्हाला शक्य होईल तेथील छायाचित्र,लघुपटाद्वारे आपणापर्यंत आमची वेबसाइट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब द्वारे पोहोचवणार आहोत.
Post A Comments